बेळगाव : शिव गणेश प्रोडक्शन, सिंधुदुर्ग–मुंबई निर्मित आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित अजरामर नाट्यकृती “इथे ओशाळला मृत्यू” येत्या मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बेळगावातील लोकमान्य रंगमंदिर (रिट्झ टॉकीज), कोनवाळ गल्ली येथे सादर होणार आहे.
प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, स्वराज्यनिष्ठा आणि बलिदान प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. नाटकात डॉ. सोनल लेले, प्रा. मिलिंद कासार, कृष्णा देसाई, पत्रकार संदेश देसाई, अजिंक्य देसाई, दीपक झोरे, मंदार जंगम, आदेश खानोलकर यांच्या प्रमुख भूमिका असून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः गणेश ठाकूर प्रेक्षकांसमोर अवतरतील.
तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम असून ध्वनी – एस. सुभाष, प्रकाश – पी. पांगम, नेपथ्य – राम सागर, रंगभूषा – पी. नित्यानंद व आर. सायली, वेशभूषा – टी. वर्षा, पार्श्वसंगीत – एन. सत्यवान यांनी नाटकाला सशक्त रूप दिले आहे.
या नाट्यप्रयोगासाठी तिकीट दर ₹५००, ₹४००, ₹३०० व ₹२०० असे ठेवण्यात आले आहेत. तिकिटांसाठी गुरु पेडणेकर (लोकमान्य रंगमंदिर) – ९३४२९३९५७० यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. तसेच BookMyShow वरही तिकिटांची विक्री सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
इतिहास, त्याग आणि पराक्रमाचा ज्वलंत अनुभव देणारे हे नाटक बेळगावच्या रसिकांनी मोठ्या संख्येने पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
