बेळगाव :
शांताई विद्याधार संस्थेने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेली १२ वर्षे अविरतपणे केलेल्या उपक्रमामुळे आजवर देशभरातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार मिळाला आहे. वृत्तपत्र विक्रीतून निधी गोळा करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवण्याचा हा मानवीय उपक्रम सतत प्रभावी ठरत आहे.
मंगळवारी माजी महापौर विजय मोरे उद्यमबागजवळील एका खासगी हॉटेलमध्ये भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांची नजर एका सेवाभावी, नम्र आणि कर्तव्यनिष्ठ मुलाकडे गेली. तो मुलगा म्हणजे श्रेयश वाघमारे, जो अगदी मनापासून ग्राहकांची सेवा करत होता. विनम्र वागणूक आणि तत्पर काम पाहून मोरे यांनी त्याच्याशी संवाद साधला.
संवादात कळले की श्रेयश हा गोमटेश पीयू कॉलेजमध्ये शिकणारा, बुद्धिमान पीयू विद्यार्थी आहे. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तो पार्ट-टाईम वेटर म्हणून काम करतो. त्याच्या जिद्दीने मोरे प्रभावित झाले आणि त्यांनी लगेच अॅलन विजय मोरे व गंगाधर पाटील यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती समजताच शांताई विद्याधार संस्थेने विलंब न लावता मदत करण्याचा निर्णय घेतला.
संस्थेच्या टीमने गोमटेश विद्यापीठात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि श्रेयशसाठी शैक्षणिक मदतीची व्यवस्था तातडीने करण्यात आली. संस्थेतर्फे देण्यात आलेला धनादेश अॅलन विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांनी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केला.
दरम्यान, श्रेयश हा एकल पालकाच्या कुटुंबातील मुलगा असून त्याची आई उद्यमबागजवळ छोटा खाद्यपदार्थाचा स्टॉल चालवून दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा भार पेलत होती, हेही समोर आले. संस्थेच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून श्रेयशला शिक्षण पुढे नेण्यासाठी नवी आशा मिळाली आहे.
समाजातून उभ्या राहणाऱ्या सकारात्मक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शांताई विद्याधार संस्थेचे हे सामाजिक कार्य!
