बेळगाव: गोवावेस येथील हॉटेल अनुग्रहमध्ये काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याच्या वेळी हॉटेलमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. हॉटेलमधील फर्निचर पेटल्यामुळे होणाऱ्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी तातडीने हॉटेलचे मालक सुधाकर पुजारी यांना संपर्क साधला. त्याचवेळी एका नागरिकाने अग्निशामक दलालाही घटनेची माहिती दिली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, काउंटर, फर्निचर, छत, इलेक्ट्रिक वायरिंग आदी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले होते.
हॉटेलचे मालक सुधाकर पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.