बेळगाव : अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा मराठी महासभेचा महामेळावा निश्चितपणे होणार असून व्हॅक्सिन डेपो हेच या वर्षीच्या मेळाव्याचे प्रमुख स्थळ ठरले आहे.
या महामेळाव्याचे आयोजन सोमवार, ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता, व्हॅक्सिन डेपो मैदानावर करण्यात आले आहे.
बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव तालुका समिती, खानापूर तालुका समिती तसेच निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील सर्व मराठी भाषिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी माणसाची शक्ती, संख्या आणि एकजूट पुन्हा एकदा दाखवण्याची ही मोठी संधी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तसेच तालुका समितीचे एम. जी. पाटील यांनी संयुक्तरित्या हा मेळावा भव्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या दडपशाहीमुळे या मेळाव्याला खंड पडला होता. मात्र यंदा मराठी बांधवांच्या एकमुखी इच्छेनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मेळावा पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी अभिमानाचा हा महामोठा मेळावा यंदा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
