बेळगाव : कोल्हापूरच्या एकदंत थेटर्स यांच्या मार्फत बेळगावमध्ये ५ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये ‘बेळगाव’ असा स्पष्ट उल्लेख केल्याने काही कानडी वृत्तवाहिन्यांनी आणि सोशल मीडिया पेजेसनी मोठा थयथयाट सुरू केला.
जाहिरातीत वापरलेल्या #बेळगाव, महाराष्ट्र या टॅगमुळेही त्यांचा आक्रोश आणखीन वाढला. मराठा बहुल शहराला ‘महाराष्ट्र’ असा संदर्भ देण्यात आला म्हणून काही कानडी माध्यमांनी आक्षेप घेत विरोधाची मालिका सुरू केली.
याच दबावाखाली एकदंत थेटर्स यांनी मूळ पोस्ट हटवून माफीची पोस्ट केली. मात्र या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांत प्रचंड संताप उसळला आहे. आपल्या मातृभाषेच्या आणि ओळखीच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या मराठी समाजाने ही मागे हटण्याची भूमिका निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मराठी भाषिक नागरिकांचे म्हणणे आहे की,
“आज ‘बेळगाव’ या नावावरून माफी मागावी लागते, उद्या मराठी कार्यक्रम घेण्यासाठीही दबाव येईल.”
याचबरोबर बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ म्हणून आजही स्थानिक मराठी जनतेने स्वीकारलेले नाही, हेही या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की स्वतः महाराष्ट्रातील काही लोकांकडूनच ‘बेळगावी’ या नावाला मिळणारे प्रोत्साहनही अत्यंत खेदजनक असून, मराठी भाषिकांच्या संघर्षाला ते धक्का देणारे आहे.
या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा बेळगावमधील ओळख, भाषिक हक्क आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचा मुद्दा तीव्रतेने पुढे आला आहे.
