बेळगाव, 22 नोव्हेंबर 2025 :
बेळगावात सुरू असलेल्या टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन निवड प्रक्रियेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या तरुणांच्या मदतीसाठी शहरातील युवक पुढे सरसावले आहेत. फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि यंग बेळगाव फाऊंडेशनच्या सदस्यांनी सीपीईडी ग्राउंड परिसरात सैन्य भरतीसाठी आलेल्या सुमारे 800 उमेदवारांना बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या वाटून सेवा दिली.
या उपक्रमात संतोष दरेकर, ऍलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, प्रदीप जुंके, सर्वेश शिंदे, योगेश जाधव, हरीश टी., राजू टक्केकर, जोगिंदर सिंग, शशिकांत आंबेवाडेकर, वरुण कर्णिक, अविनाश पी. आणि महेश्वरी हलोळी यांसह अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.
शौर्य सर्कल आणि आसपासच्या रस्त्यांवर, खुले जागेत विश्रांती घेत बसलेल्या उमेदवारांची जिद्द आणि देशसेवेची तळमळ पाहून स्वयंसेवकांनी हा छोटा पण मनाला भिडणारा उपक्रम राबविला. तरुणांनी दाखविलेली निःस्वार्थ देशभक्ती आणि कष्ट करण्याची तयारी पाहून हा उपक्रम भावनिक व प्रेरणादायी ठरल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.
सहाय्य मिळाल्याने सैन्याभिलाषी तरुणांनी मनापासून आभार मानले. समाजात एकता, देशभक्ती आणि परस्पर सहाय्यभावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांना पुढेही चालना देण्याचा निर्धार या समूहाने व्यक्त केला आहे.
