बेळगाव, शहापूर :
बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेला पुढे नेत शहापूर-आचार्य गल्ली येथील उदयोन्मुख तरुण कलाकार अभिजित देशपांडे आता कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. स्थानिक नाट्यमंचावरून थेट कन्नड फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो आहे.
शिक्षणातून कलाजागरूकता
अभिजित देशपांडे यांचे शालेय शिक्षण V. M. शानभाग मराठी हायस्कूल येथे झाले. पुढे त्यांनी गोगटे कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. लहानपणापासूनच गायन, अभिनय आणि क्रिकेट यांची आवड असल्याने ते सतत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत राहिले.
नाटकातून घडलेले व्यक्तिमत्त्व
२०१४ सालच्या कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतल्याने अभिजित यांच्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात झाली. विविध नाटकं, एकांकिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते बेळगावच्या तरुण कलाकारांमध्ये ओळख मिळवू लागले.
नोकरीसोबतच अभिनय प्रवास
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरी करत असतानाही अभिनयाची आवड न सोडता त्यांनी सातत्याने शॉर्ट फिल्म्स केल्या. आता त्यांनी दोन फीचर फिल्म्स पूर्ण केल्या असून त्यापैकी एक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कन्नड चित्रपटात पदार्पण
अभिजित देशपांडे यांचा पहिला कन्नड व्यावसायिक चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. यामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका भावनिक आणि वेगळ्या छटेची असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक प्रेक्षकांमध्ये अभिजितच्या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता असून बेळगावचा हा तरुण कलाकार कन्नड चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप नक्कीच उमटवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
