बेळगाव : शहर पोलिस आयुक्तालयातर्फे नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासन आदेशानुसार बेळगाव शहरातील वाहतूक आणि इतर प्रकरणांतील प्रलंबित दंडावर ५०% सूट देण्यात येणार आहे. ही विशेष सवलत २१ नोव्हेंबर २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.
पोलिस आयुक्तांनी सांगितले की, बेळगाव शहरातील नागरिकांनी प्रलंबित दंडाची रक्कम अर्ध्या दरात भरून प्रकरण निकाली काढण्याची ही उत्तम संधी आहे. वर्षभरातील अनेक दंड रकमा न भरल्याने बाकी वाढत असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कुठे भरता येईल दंड?
पोलिस आयुक्तालयाने दंड भरण्यासाठी शहरातील विविध केंद्रांची यादी जाहीर केली आहे—
- सर्व वाहतूक पोलिस ठाण्यांमध्ये
- पोलिस आयुक्त कार्यालयातील खास काऊंटरवर
- ‘कर्नाटक वन / बेळगाव वन’ केंद्रांमध्ये
उपलब्ध केंद्रे :
- अशोक नगर
- दूरदर्शन नगर (TV. सेंटर)
- रिसालदार गल्ली
- गोवावेस
तसेच, ई-चलान संबंधित तांत्रिक मदतीसाठी व चौकशीसाठीही वरील केंद्रांवर सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
पोलिस विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, या कालावधीत दंड भरून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. ही योजना केवळ मर्यादित काळासाठी असल्याने त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
