बेळगाव : येणाऱ्या ८ डिसेंबरपासून सुवर्णसौधात सुरू होणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बेळगाव साक्षी राहणार आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांसाठी विशेष इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येत असून, राणी चन्नम्मा विद्यापीठासह तीन विद्यापीठांमधून निवडलेल्या ३० विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस अधिवेशन अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना सदनाचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची, सुवर्णसौधातील ग्रंथालयाचा वापर करण्याची आणि तज्ज्ञ व्यक्तींची प्रेरणादायी व्याख्यानं ऐकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती विधानसभाध्यक्ष यू. टी. खाडर यांनी बेळगावात दिली.
याशिवाय, दररोज ५०० विद्यार्थ्यांना सभागृह दर्शनाची संधी दिली जाणार आहे. दर्शक दालनातील वेळ वाढवून २०–२५ मिनिटे करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या काळात सुवर्णसौध परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बेळगावातील नागरिकांसह क्रीडापटू, कामगार, महिला, शासकीय कर्मचारी व ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही दर्शक दालनात जागा मिळणार आहे.
विधानपरिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी कृषी, शिक्षण, महिला व बालविकास विभागांशी संबंधित आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मंत्र्यांना अधिवेशनातून तात्पुरते बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे सांगितले.
बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिवेशनासाठी १२ समित्या स्थापन करण्यात आल्या असून निवास, वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय सेवा व इतर सर्व सुविधा युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्त भोरसे गुलाबराव भूषण यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली.
सुवर्णसौध परिसरात वाहतूक व्यवस्थापन, आंदोलनकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा, हेल्पलाइन केंद्र, मंत्री-आमदारांसाठी वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका यांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
