बेळगाव (प्रतिनिधी)
बेळगावमध्ये गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित २५ व्या रौप्यमहोत्सवी मराठी बाल साहित्य संमेलनाची सुरुवात मराठी विद्यानिकेतन शाळेच्या ग्रंथालयातून निघालेल्या भव्य पुस्तक दिंडीने जोरदार झाली. संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. मृणाल पर्वतकर यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेतील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुस्तक दिंडीला चालना दिली. विद्यार्थ्यांनी हातात जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटना यांची प्रतीकात्मक पुस्तके घेऊन या दिंडीत सहभाग नोंदवला. विविध कर्तृत्ववान व्यक्तींचे वेश परिधान केलेले विद्यार्थी आणि सुरुवातीला सजलेल्या लेझीम पथकाने दिंडीचे विशेष आकर्षण वाढवले.
दिंडी मराठी विद्यानिकेतन शाळेतून निघून कॉ. कृष्णा मेणसे साहित्य नगरीत पोहोचली. “या विश्वाची आम्ही लेकरे”, “ही माय भूमी ही जन्मभूमी” या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.
स्वागतपर भाषण अनिकेत जाधव यांनी, तर प्रास्ताविक इंद्रजीत मोरे यांनी केले. १९९७ पासून आजपर्यंत मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात अविरत कार्य करीत आलेल्या साठे मराठी प्रबोधिनीच्या वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा यावेळी घेण्यात आला. संस्थेच्या व्यासपीठावरून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आज विविध क्षेत्रांतील ओळख अधोरेखित करण्यात आली.
त्यानंतर प्रा. मृणाल पर्वतकर आणि दीपक पर्वतकर यांच्या हस्ते महात्मा फुले दाम्पत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्यासोबत जयंत नार्वेकर, सुभाष ओउळकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटक दीपक पर्वतकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बेळगाव शहराशी असलेल्या जुने नात्याचा उल्लेख करत आयोजक संस्थेचे आणि विशेषत: मराठी विद्यानिकेतन शाळेच्या ग्रंथालयाचे कौतुक केले. बालसाहित्यात इसापनीती कथांचे आजही असणारे मार्गदर्शन, तसेच आई ही बालसाहित्याची पहिली लेखक असते, असे सांगत त्यांनी आधुनिक पिढीच्या बदलत्या विचारसरणीशी सुसंगत असे साहित्य निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी संस्थेला ₹५१,००० ची देणगी जाहीर केली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या कथाकथन आणि बालकवितांच्या सादरीकरणाचा रंगतदार कार्यक्रम झाला. तिसऱ्या सत्रात “मधली सुट्टी” हे नाटक विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. मृणाल पर्वतकर यांनी वाचनाची गोडी आणि व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाचे महत्त्व यावर परखड विचार मांडले.
कार्यक्रमाचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. आभार प्रदर्शन सायली भोसले यांनी, तर सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी सुरेखपणे पार पाडले.
संपूर्ण संमेलनात बालसाहित्य, वाचनसंस्कृती आणि मराठी भाषेच्या जपणुकीचा अभिवृद्धीचा संदेश उत्साहात देण्यात आला.
