बेंगळुरू : कर्नाटक सरकारने IT क्षेत्र बेंगळुरूच्या बाहेर विस्तारण्यासाठी मोठी आर्थिक प्रोत्साहने जाहीर केली असून याचा थेट फायदा बेळगाव, हुबळी-धारवाड, शिवमोग्गा, मैसूर, मंगळूर, कलबुर्गी आणि दावणगेरे या शहरांना होणार आहे.
IT धोरण 2025-30 च्या मसुद्यानुसार, बेंगळुरूच्या बाहेर युनिट सुरू करणाऱ्या IT आणि ITES कंपन्यांना खालील सवलती देण्यात येणार आहेत—
५०% भाडे परतावा – ₹2 कोटीपर्यंत
मालमत्ता करात ३०% परतावा – ३ वर्षांसाठी
वीज शुल्कावर १००% सूट – ५ वर्षांसाठी
दूरसंचार व इंटरनेट खर्चात २५% परतावा – ₹12 लाखांपर्यंत
राज्य सरकारचा उद्देश पुढील ५ वर्षांत ₹445 कोटींच्या गुंतवणुकीतून बेंगळुरूच्या बाहेर IT क्लस्टर्स विकसित करण्याचा आहे. शहरातील वाढत्या ट्रॅफिक, पायाभूत सुविधांवरील ताण आणि रिअल इस्टेटच्या वाढत्या खर्चामुळे IT कंपन्यांना पर्यायी केंद्रांकडे वळवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
प्रत्येक प्रोत्साहन श्रेणीमध्ये १०० अर्जदारांची मर्यादा ठेवून सरकारने टप्प्याटप्प्याने नवीन कंपन्या शहरांत आणण्याची रणनीती आखली आहे. तसेच एकाच खिडकीतून परवानग्या, श्रम कायद्यातील सवलती, डिजिटल प्लॅटफॉर्म अशी अतिरिक्त सुविधा देखील देण्यात येणार आहे.
या धोरणामुळे भविष्यात बेळगावसारख्या शहरांत नवीन IT पार्क्स, रोजगाराच्या संधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
