बेळगाव : हालगा येथे आज, शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. खाजगी शाळेची बस चालकाला अचानक फिट (मृच्छा) आल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन दुचाकीस्वारांना जोरदार धडक देत थेट शाळेच्या भिंतीवर आदळली. या घटनेत दोघे दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने अपघाताच्या वेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, हालगा येथील एका शाळेची बस विद्यार्थ्यांना घरी सोडून माघारी शाळेकडे येत होती. शाळेजवळ पोहोचताच चालकाला अचानक फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या बसने रस्त्याशेजारी आपल्या दुचाकीसह थांबलेल्या दोन व्यक्तींना चिरडत पुढे शाळेच्या आवारातील भिंतीवर धडक दिली.
अपघातानंतर क्षणात रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली आणि त्यांची विचारपूस केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रुग्णवाहिका मागवली आणि जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाडले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
📌 चालकाला अचानक आलेल्या फिटमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
