बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव शहरात बसून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक कॉल सेंटरचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ३३ जणांना अटक करण्यात आली असून, हे एक मोठे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

बेळगावमध्ये एक कॉल सेंटर कार्यरत असल्याची विश्वसनीय माहिती आणि एका निनावी अर्जाच्या आधारे, डीसीपी नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखालील एसीपी रघु, माळमारुतीचे सीपीआय बी. आर. गड्डेकर, एपीएमसीचे पीआय उस्मान औटी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवरील कुमार हॉल येथे चालणाऱ्या या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत तेथे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे कॉल सेंटर चालवले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३७ लॅपटॉप, ३७ मोबाईल फोन, ३ वायफाय राऊटर असा एकूण सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राथमिक तपासानुसार, हे आरोपी अमेरिकन नागरिकांना “Your Amazon order has been placed” असा संदेश पाठवून, त्यात दिलेल्या बनावट “कस्टमर सर्व्हिस” क्रमांकावर फोन करण्यास प्रवृत्त करत. त्यानंतर त्यांच्या नाव, खाते माहिती घेत “तुमच्या नावावर अनेक बँक खाती उघडली गेली आहेत” अशी भीती दाखवून त्यांच्या खात्यातील रक्कम फसवणुकीने हस्तांतरित करत होते.
अटक करण्यात आलेले ३३ आरोपी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कोलकाता, उत्तर प्रदेश, झारखंड आणि नागालँड या राज्यांतील असल्याचे समोर आले आहे. तर या रॅकेटचे मुख्य सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) नारायण बरमणी, एसीपी रघु, तसेच सायबर गुन्हे पोलिस ठाण्याचे सीपीआय बी. आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत एपीएमसीचे पीआय उस्मान औटी, पीएसआय एम. वाय. कारिमणी, सरदारगौडा मुत्तत्ती आणि इतर पोलिस अधिकारी सहभागी होते.
#Belgav #BedhadakBelgav
