बेळगाव :
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक व्यापारी आणि उद्योग आस्थापनांवरील फलकांच्या संदर्भात कर्नाटक रक्षण वैदिकेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत व्यापाऱ्यांवर दादागिरी सुरू केली आहे. व्यापाऱ्यांना कन्नड फलक मोठे लावण्यासाठी धमक्या देत तसेच काही ठिकाणी दगडफेक करून तोडफोडीच्या घटनाही घडवण्यात आल्या आहेत.
खरं तर अशा प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार महापालिकेकडे असतानाही, कर्नाटक रक्षण वैदिकेचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन शहरात अराजक निर्माण करत आहेत. या गुंडगिरीचा तीव्र निषेध करत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात समितीच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात येणार आहे. जर रक्षण वैदिकेच्या या गुंडगिरीला वेळीच आळा घातला गेला नाही, तर महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या पद्धतीने उत्तर देईल.
समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, व्यापाऱ्यांवर होणारी ही जबरदस्ती आणि दादागिरी तातडीने थांबवावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील.
#Belgav #BedhadakBelgav
