काव्यगंधात रंगले रसिक श्रोतेगण; शब्दगंध कवी मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव – कवितेचा सुगंध, चारोळींचा गंध आणि शब्दांच्या सर्जनशीलतेने भारलेले वातावरण अशी अविस्मरणीय काव्यरात्र ‘शब्दगंध कवी मंडळ संघा’च्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा मंदिरात अनुभवायला मिळाली. “शब्दगंध हे कुटुंब अमुचे, सदैव आनंदा सारे साहू…” अशा ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण सभागृहात काव्यगंध दरवळला.
या विशेष निमित्ताने चारोळी लेखन स्पर्धा, ‘काव्यगंध’ कवितांचा कार्यक्रम आणि काव्यसंग्रह प्रकाशन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. अशोक आलगोंडी यांनी भूषविले, तर दीपप्रज्वलन दीपक किल्लेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंधचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले. उद्घाटनपर भाषणात दीपक किल्लेकर यांनी शब्दगंधच्या ३५ वर्षांच्या साहित्यसेवेबद्दल गौरवोद्गार काढले.
यानंतर झालेल्या चारोळी लेखन स्पर्धेत तब्बल २५ हून अधिक कवींनी सहभाग घेतला. ‘धागेदोरे’ या विषयावर लिहिलेल्या चारोळ्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेत प्रा. रामदास बिर्जे (कोवाड) यांनी प्रथम, कु. हर्ष अजय पावशे (मराठी विद्यानिकेतन) यांनी द्वितीय आणि कु. सोनल शेखर शहापूरकर (महिला विद्यालय) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सुंठणकर व कवी शिवाजी शिंदे यांनी काम पाहिले.
यानंतर ‘काव्यगंध’ या बहारदार कविसंमेलनाने कार्यक्रमाला शिखर गाठून दिले. बसवंत शहापूरकर यांनी “बाईच्याच जीवावर संसार हा तरला” असे म्हणत बाईच्या त्यागाची महती गायली. कवयित्री उर्मिला शहा यांनी “मी आता एक्सपायरी डेटेड…” अशा ओळींनी समाजाचे कठोर वास्तव मांडले. रेखा गद्रे यांनी ‘शब्दगंध’, ‘फिकीर’, ‘हुंडाबळी’ या कवितांनी रसिकांना विचार करायला भाग पाडले. परशराम खेमणे यांनी ‘भाकरी’, ‘पाऊस’, ‘जमले नाही’ या कवितांमधून जीवनातील गूढ अर्थ उलगडला.
कवी गुरुनाथ किरमटे यांनी खुमासदार निवेदन करत “उर भरून स्वतःसाठीही एक दोन श्वास घेईन म्हणतो…” या कवितेने श्रोत्यांची दाद मिळवली.
या कार्यक्रमात दिवंगत कवयित्री सूर्यप्रभा मधुकर सावंत यांच्या ‘अमृतधारा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते झाले. तसेच दामोदर मळीक (गोवा), स्नेहल बर्डे आणि रोशनी हुंदरे या कवींना त्यांच्या नव्या काव्यसंग्रह प्रकाशनाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी वाय. पी. नाईक, निळूभाऊ नार्वेकर, जयवंत जाधव, अश्विनी ओगले, व्ही. एस. वाळवेकर, मधुकर सावंत, मोनिका डांगरे, पुंडलिक पाटील, प्रेमा मेणशी, मधू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्मिता किल्लेकर यांनी मानले.
#Belgav #BedhadakBelgav
