बेळगाव : हत्तरगी टोल येथे घडलेली एक हृदयस्पर्शी घटना मानवतेचा खरा अर्थ पुन्हा अधोरेखित करणारी ठरली आहे. ह्युमॅनिटी फाउंडेशन बेलगावचे सदस्य आणि ट्रान्सजेंडर समुदायातील प्रदीप यांनी जखमी माकडाला वाचवून करुणेचा अद्वितीय आदर्श दाखवला.
टोलवर उपजीविका करत असताना प्रदीप यांनी एका वाहनाने जखमी झालेल्या माकडाला रस्त्यावर तडफडताना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तत्काळ धाव घेतली, जागेवरच माकडाला प्रथमोपचार दिला आणि त्यानंतर उपचारासाठी हिडकळ धरण येथील प्राणी रुग्णालयात नेले.
प्रदीप यांच्या तत्परतेमुळे त्या माकडाचे प्राण वाचले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले आहे.
ही घटना सर्व सजीवांप्रती दयाळूपणाचे आणि मानवतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे. ह्युमॅनिटी फाउंडेशनकडून प्रदीप यांच्या या कृतीचे कौतुक करण्यात आले असून समाजात अशा संवेदनशीलतेची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
