कुद्रेमनीत युवक संघटनांचा एल्गार : ग्रामविकास अधिकाऱ्याच्या हकालपट्टीची मागणी
कुद्रेमनी : कुद्रेमनी ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी (पी.डी.ओ.) यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी वाल्मिकी युवक संघटना, आंबेडकर संघटना आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघटना यांनी केली आहे. या मागणीसाठी गावातील युवकांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयात एल्गार पुकारला.
युवकांनी ग्रामपंचायत अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील बेरोजगार युवकांनी पोल्ट्री, किराणा दुकान, काजू फॅक्टरी, रेशीम उत्पादन, वेल्डिंग, सुतारकाम, लोहारकाम, डेअरी तसेच विविध यशस्वी योजनांअंतर्गत अनुदान आणि सबसिडी मिळवण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी एन.ओ.सी., व्यवसाय परवाना काढून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून ५० हजार, ३० हजार, २५ हजार, १५ हजार, १० हजार अशी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर आरोपांवर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीत बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने उपस्थित युवकांत संताप व्यक्त झाला. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुन्हा मंगळवारी ग्रामपंचायतीत बैठक बोलावण्यात आली आहे.
यावेळी संघटनांनी आवाहन केले की, ज्यांना अशा प्रकारच्या आर्थिक उकळणीचा अनुभव आला आहे त्यांनी बैठकीत उपस्थित राहून आपली तक्रार लेखी स्वरूपात द्यावी, जेणेकरून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करता येईल.
#Belgav #BedhadakBelgav
