बेळगाव | प्रतिनिधी
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) बेळगावमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जागांचे नूतनीकरण नाकारले आहे. ही कारवाई NMC च्या एका मूल्यांकन अधिकाऱ्याने १० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपानंतर करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली असून, त्याने संबंधित महाविद्यालयासाठी अनुकूल अहवाल देण्यासाठी ही लाच स्वीकारल्याचा आरोप आहे, असे अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, “हे प्रकरण इतरांना इशारा ठरेल असा ठाम संदेश देण्यासाठी, सदर महाविद्यालयाच्या पदवी (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमातील जागांचे नूतनीकरण २०२५-२६ साठी करण्यात येणार नाही. तसेच, २०२५-२६ साठी प्राप्त झालेल्या नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या व जागा वाढवण्याच्या सर्व विनंत्याही रद्द करण्यात येत आहेत.”
या प्रकरणात संशयित अधिकाऱ्याची चौकशी प्रलंबित असताना, त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयात सध्या २०० पदवीपूर्व जागा असून, हे महाविद्यालय ‘डीम्ड-टू-बी युनिव्हर्सिटी’ अंतर्गत येते. त्यामुळे यातील कोणतीही जागा राज्य शासनासोबत सामायिक केली जात नव्हती.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या घडामोडींबाबत त्यांना NMC कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.