इटगीतील ४० विद्यार्थ्यांचा टीसी प्रश्न सुटला; डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पुढाकाराने मिळाला न्याय
खानापूर : इटगी येथील तब्बल ४० विद्यार्थ्यांचा टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) संदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर सुटल्याच जमा झाला आहे. या प्रकरणात डॉ. अंजली निंबाळकर यांनी अन्यायग्रस्त विद्यार्थी आणि पालकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत न्याय मिळवून दिला.
जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या माहितीनुसार, माननीय न्यायालयाने आज या प्रकरणातील स्टे व्हेकंट केला असून उद्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे टीसी मिळून त्यांचे पुढील शिक्षण आता सुरळीत सुरू होणार आहे. ही चांगली बातमी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी स्वतः डॉ. अंजली निंबाळकर यांना दिली.
या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थी, पालक, ब्लॉक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी एकजूट दाखवून सहकार्य केले. ब्लॉक काँग्रेसने रात्रभर थांबून आंदोलनकर्त्या पालकांना व विद्यार्थ्यांना साथ दिली, तसेच डी.डी.पी.आय. आणि पालक यांच्यात समेट घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रशासन आणि पोलिस विभागाचे सहकार्यही उल्लेखनीय ठरले.
डॉ. अंजली निंबाळकर यांनी याआधीच इटगी येथे नवीन हायस्कूल पुन्हा मंजूर करून आणण्यात पुढाकार घेतला होता. शासनाने त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारी शाळेची मंजुरी दिली होती. विद्यार्थ्यांना पुन्हा टीसीसाठी आंदोलन करावे लागल्यावर त्यांनी ठाम हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावला.
शेवटी त्यांनी सर्व शिक्षणसंस्था चालकांना आवाहन केले आहे की विद्यार्थ्यांना किंवा पालकांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करणे टाळावे.
#Belgav #BedhadakBelgav
