बेळगाव : खानापूर तालुक्यातील सुळेगाली गावात दोन हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे वन, पर्यावरण आणि पर्यावरणीय संतुलनमंत्री तसेच बीदर जिल्ह्याचे पालकमंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी तात्काळ गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंत्री खंड्रे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, हत्तींच्या मृत्यूबाबत तातडीने तपास सुरू करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच या घटनेत वन विभागातील कर्मचाऱ्यांचा कुठलाही निष्काळजीपणा आढळल्यास त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून ५ दिवसांच्या आत सादर करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
सुळेगाली परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप आणि दुःखाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
मंत्री खंड्रे यांनी म्हटले आहे की, “वन्यजीवांचे संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांना निश्चितच जबाबदार धरले जाईल. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने कार्यवाही करावी.”
वन विभागाकडून या घटनेच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून, अहवाल मिळताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
#Belgav #BedhadakBelgav
