बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या ‘संध्याकिरण सेवा केंद्रा’ तर्फे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर कवी गुरुनाथ किरमिटे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
कवी गुरुनाथ किरमिटे यांनी सामाजिक विषयांवर आधारित कविता आणि चारोळ्या सादर करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. त्यांची “मरता केव्हाही येते, थोडे जगता आले पाहिजे” ही कविता प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.
कार्यक्रमात श्रीकृष्ण खानोलकर यांनी नाट्यगीत, औदुंबर शेट्ये यांनी अभंग, चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर केली. तसेच रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, सदाशिव व गिरिजा कुलकर्णी, विजय वाईगडे, प्रकाश कुडतरकर, जगमोहन अगरवाल, सुरेंद्र देसाई आणि शोभा हतरकी यांनी मराठी आणि हिंदी गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेंद्र देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवराज पाटील यांनी केले.
सभासदांच्या आग्रहास्तव यापुढे दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी अशा ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
