बेळगावच्या रायडर्सनी उमलिंग ला सर करत घडविला इतिहास, जगातील सर्वात उंच मोटारसायकल खिंड केली पार

बेळगावच्या रायडर्सनी उमलिंग ला सर करत घडविला इतिहास, जगातील सर्वात उंच मोटारसायकल खिंड केली पार


बेळगाव : बायकिंग ब्रदरहूड या बेळगावातील प्रसिद्ध बाइकिंग ग्रुपच्या सहा रायडर्सनी ७ जून २०२५ रोजी आपल्या बाईकसह जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठी खुली खिंड – उमलिंग ला (१९,०२४ फूट) – यशस्वीरित्या सर करत इतिहास रचला आहे. ३५ वर्षांवरील रायडर्सनी एकत्र येऊन या साहसी प्रवासाची सुरुवात केली आणि प्रतिकूल हवामान, कठीण भूभाग आणि शारीरिक मर्यादा यांवर मात करत हे अभूतपूर्व यश मिळवलं.

या धाडसी मोहिमेची सुरुवात बेळगाव येथून झाली. पहिल्या चार दिवसांत रायडर्सनी उष्ण मैदानं, डोंगराळ वाटा आणि थकवणाऱ्या अंतरावर मात करत थेट लडाखची राजधानी लेह येथे पोहोचले. तेथे उंचीशी शरीराची जुळवाजुळव झाल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. लडाखमधील अतिशय कठीण आणि प्रसिद्ध खिंडींचा सामना करत त्यांनी बाइकद्वारे खारदुंग ला, चांगला खिंड, बारालाचा खिंड आणि शिंकुला खिंड पार केल्या. प्रत्येक खिंडीत वेगळी आव्हानं होती – काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता, काही ठिकाणी रस्त्यांची अभावित अवस्था, तर काही ठिकाणी थंडीचा कडाका. या सगळ्या अडचणींवर त्यांनी एकत्रितपणे मात केली.

प्रवासादरम्यान त्यांनी पँगोंग त्सो सरोवराचं अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवले आणि झांस्कर खोऱ्यातील खडकाळ, पण भुरळ घालणाऱ्या भागांतून प्रवास करत पुढचा टप्पा गाठला. शेवटी, त्यांनी पोहोच केली ती उमलिंग ला येथे – जे ठिकाण सध्या जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठी खुलं रस्ता म्हणून ओळखलं जातं. समुद्रसपाटीपासून तब्बल १९,०२४ फूट उंचीवर पोहोचणं ही केवळ धाडसाची नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक क्षमतेची पराकाष्ठा होती. या क्षणी त्यांच्यासाठी ही केवळ एक विजयाची भावना नव्हती, तर तो त्यांच्या समर्पणाचा, तयारीचा आणि बाइकिंगवरील निष्ठेचा गौरव होता.

ही अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या सहा रायडर्समध्ये प्रवीण कुलकर्णी, अमित रावूत, महेश हसबे, श्रेय धनवडकर, रोहन हटकर आणि दीपक हिरेमठ यांचा समावेश होता. या सर्वांनी केवळ आपली शारीरिक तयारी नव्हे, तर परस्परांतील सुसंवाद, टीमवर्क आणि एकमेकांच्या आधारावर हा खडतर प्रवास यशस्वी केला.

या मोहिमेच्या माध्यमातून बायकिंग ब्रदरहूड या ग्रुपने हे सिद्ध केले की जिथे जिद्द, चिकाटी आणि साहस असतं, तिथे अशक्य असं काहीच नसतं. ही कामगिरी बेळगावच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद असून, शहरातील तरुण पिढीसाठी ती एक मोठी प्रेरणा ठरणार आहे. या मोहिमेमुळे बेळगावचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाइकिंग नकाशावर अधिक ठळकपणे उमटलं आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 17 =

error: Content is protected !!