बेळगाव :
कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात तणाव निर्माण होऊ नये म्हणून बेळगाव जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील खासदार श्री. धैर्यशील माने, शिवसेना तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. विजय शामराव देवणे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) तसेच शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस) चे सुमारे २५ कार्यकर्ते व समर्थक यांना १ नोव्हेंबर २०२५ रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
उपायुक्त व जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन (भा.प्र.से.) यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा प्रतिबंधक आदेश जारी केला आहे.
राज्योत्सवाच्या दिवशी महाराष्ट्रातील नेते निपाणीमार्गे बेळगावात येऊन “काळा दिवस” पाळण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. अशा पार्श्वभूमीवर भाषिक वैमनस्य वाढू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद आहे.
या आदेशानुसार श्री. धैर्यशील माने, श्री. विजय देवणे, श्री. संजय पूवार, श्री. सुनील शिंत्रे, श्री. सुनील मोदी आणि इतर शिवसेना कार्यकर्त्यांना जिल्ह्यात प्रवेशास मनाई राहणार आहे.
पोलिस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद व महानगरपालिका आयुक्त यांना हा आदेश तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
