खानापूर तालुक्यातील राणी चनम्मा संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, इटगी येथे दाखले (टीसी) न दिल्याने निर्माण झालेल्या वादानंतर गेल्या दोन दिवसांत परिस्थिती चिघळली होती. ४० विद्यार्थ्यांनी दाखले न मिळाल्याने पालकांसह खानापूर बीईओ कार्यालयासमोर ठाण मांडले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या घडामोडीत जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) स्वतः पहाटे १.३० वाजता खानापूर बीईओ कार्यालयात दाखल झाल्या, तर नंदगड सीपीआय रात्री ११.३० वाजता घटनास्थळी पोचले.
रात्री २.३० वाजेपर्यंत डीडीपीआय यांनी पालकांसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत बीईओ, नंदगड पोलीस ठाण्याचे पीएसआय, पालक प्रतिनिधी सूर्यकांत कुलकर्णी, रायप्पा बळगप्पनवर, दशरथ बनोशी, सुरेश भाऊ, नगरसेवक तोहीद, पांडू पाटील पूर, विठ्ठल हिंडलकर, विठ्ठल केळोजी आदी उपस्थित होते.
खानापूर ब्लॉक काँग्रेसची समंजस भूमिका
या सर्व प्रकरणात खानापूर ब्लॉक काँग्रेसने मध्यरात्री हस्तक्षेप करत समंजस भूमिका घेतली. पहाटे ४.३० वाजता पालक, विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातील चर्चेनंतर आंदोलन कायदेशीर कारणास्तव तात्पुरते २-३ दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.
ब्लॉक काँग्रेसने शिक्षण संस्था चालकांना आवाहन केले की, विद्यार्थ्यांना अडवणूक न करता जिथे त्यांना शिक्षण घ्यायचे आहे, तिथे शिकू द्यावे. “मुलांचे नुकसान होऊ देऊ नये, त्यांना त्यांचे टीसी मिळालेच पाहिजेत, कारण ते त्यांचा हक्क आहे,” असे मत काँग्रेसने व्यक्त केले.
न्यायालयीन प्रक्रिया सुरूच
दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी व विद्यार्थी-पालक याचिकाकर्ते धारवाड हायकोर्टात जाऊन सरकारी अभिवक्त्याशी चर्चा करणार आहेत. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुढील मार्ग ठरवला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
डॉ. अंजली निंबाळकर यांचे लक्ष
खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली हेमंत निंबाळकर या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असून, त्या लवकरच शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांशी संपर्क साधणार आहेत. “मुलांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना लवकरात लवकर दाखले मिळावेत,” यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
