नंदगडमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची जनजागृती मोहीम : १ नोव्हेंबर काळा दिनी कडकडीत हरताळचे आव्हान

नंदगडमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची जनजागृती मोहीम : १ नोव्हेंबर काळा दिनी कडकडीत हरताळचे आव्हान

नंदगड : येत्या शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नंदगड येथे केले. या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नंदगड शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदगड बसस्थानक व बाजारपेठ परिसरात फेरी काढून मराठी भाषिकांना पत्रकांचे वाटप करण्यात आले. काळा दिनी हरताळाचे आवाहन करत मराठी जनतेत जागृती निर्माण करण्यात आली.

समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदरसह मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. त्या अन्यायाविरोधात गेल्या ६८ वर्षांपासून मराठी भाषिक जनता लोकशाही मार्गाने लढा देत आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही आणि कानडीकरणाच्या विरोधात दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन साजरा केला जातो.

या पार्श्वभूमीवर यंदा १ नोव्हेंबर रोजी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळून मराठी जनतेची ताकद दाखवण्याचा निर्धार नागरिकांनी केला. तसेच शनिवारी खानापूर येथील शिवस्मारकाजवळ आयोजित लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती मोहिमेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश चव्हाण, प्रवीण पाटील, मोहन गुरव, ब्रह्मानंद पाटील, रुक्मण्णा झुंझवाडकर, विठ्ठल गुरव, ज्ञानेश्वर गुरव, ज्ञानेश्वर बिडीकर, सेवानिवृत्त मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य राजाराम देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − one =

error: Content is protected !!