महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक; १ नोव्हेंबरच्या मूक सायकल फेरीत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक; १ नोव्हेंबरच्या मूक सायकल फेरीत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावची व्यापक बैठक समिती कार्यालय कावळे संकुल येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत १ नोव्हेंबर ‘काळा दिवस’निमित्त आयोजित मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

भाषावार प्रांत रचनेदरम्यान मराठी बहुल बेळगाव प्रदेशाचा अन्यायाने म्हैसूर (कर्नाटक) राज्यात समावेश करण्यात आला. त्या अन्यायाचा निषेध म्हणून १९५६ पासून १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. सीमाभागातील मराठी जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा आजही तितक्याच प्रखरतेने कायम आहे. यंदाच्या काळा दिनाच्या मूक सायकल फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मराठी एकजूट प्रदर्शित करावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले.

बैठकीत सीमाप्रश्नी वादग्रस्त विधाने करून मराठी समाजाची भावना भडकवणारे खासदार जगदीश शेट्टर आणि कन्नड संघटनांच्या नेत्यांचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.

उच्च न्यायालयात काळा दिवस संदर्भातील याचिकेत मराठी भाषिकांच्या बाजूने लागलेल्या निकालाचे स्वागत करत, यशस्वीपणे बाजू मांडणारे अॅड. महेश बिर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव कोरला गेला. तसेच या निर्णयाचा मान राखत मूक सायकल फेरीत प्रशासनाने कोणतीही अडथळा निर्माण करू नये, तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणू नये, अशी मागणी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी केली.

बैठकीस उपाध्यक्ष वासू सामजी, पदाधिकारी गुंडू कदम, सुरज कुडुचकर, खजिनदार विनायक कावळे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, महेश जाधव, आकाश भेकणे, सुरज चव्हाण, विकास भेकणे, प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + eleven =

error: Content is protected !!