बेळगाव: के.एल.ई. विद्यापीठात रविवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. नर्सिंग विभागातील सुमारे ४० विद्यार्थी वसतिगृहात रात्रीचं जेवण केल्यानंतर अचानक आजारी पडले आहेत.
विद्यार्थ्यांना वांती, मळमळ, पोटदुखी आणि डोके गरगरणे अशी लक्षणं दिसू लागल्याने विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कारवाई केली. यापैकी १५ विद्यार्थ्यांना डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं, तर उर्वरित २५ विद्यार्थ्यांना वसतिगृहातच प्राथमिक उपचार देऊन परत पाठवण्यात आलं.
विद्यापीठाच्या वाहनांमधून आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं असून, डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीरता दाखवत अन्न नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे. वसतिगृहातील भोजनामुळेच अन्न विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
