बेळगाव (प्रतिनिधी): १ नोव्हेंबर २०२३ रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाळण्यात आलेल्या काळा दिन आणि मूक सायकल फेरी प्रकरणात दाखल गुन्ह्यातील कार्यकर्त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांसह कर्नाटक विरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांवर भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून मार्केट पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १४२, १४७, १५३, २९० सह १४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण १४ नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, त्यापैकी ९ जणांनी जामीन अर्ज दाखल केला होता.
JMFC कोर्ट क्रमांक २, बेळगाव येथे C.C. केस क्र. २९१७/२०२४ मध्ये आज सुनावणी झाली असून, न्यायालयाने मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, नेताजी जाधव आणि विकास कलघटगी या कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या खटल्याचे काम ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. एम.बी. बोंद्रे, ॲड. वैभव कुट्रे आणि ॲड. अश्वजीत चौधरी यांनी पाहिले. तर माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी जमीनदार म्हणून हजेरी लावली.
या खटल्याची पुढील सुनावणी १८ डिसेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
#Belgav #BedhadakBelgav
