बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात संचालक पदांसाठी रविवारी निवडणुका पार पडल्या असून, तीन जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. अथणीमधून आमदार लक्ष्मण सवदी, रायबागमधून अप्पासाहेब कुलगोडे आणि रामदुर्गमधून मल्लप्पा यादवड हे विजयी ठरले. यापैकी सवदी आणि यादवड हे कत्ती-सवदी पॅनेलचे सदस्य मानले जातात, तर कुलगोडे हे जोल्ले-जारकीहोळी पॅनेलचे सदस्य आहेत.
धारवाड खंडपीठाच्या आदेशानुसार उर्वरित चार जागांचे निकाल थांबविण्यात आले असून, अंतिम निकाल २८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. बँकेच्या एकूण २० संचालकांपैकी १६ पदांसाठी निवडणुका होतात. यापैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सात जागांसाठी रविवारी बी.के. मॉडेल हायस्कूल, बेळगाव येथे मतमोजणी झाली.
जोल्ले-जारकीहोळी पॅनेलने दावा केला आहे की बिनविरोध विजयी झालेले नऊही उमेदवार त्यांच्या गटाचे आहेत. तर कत्ती-सवदी पॅनेलने हा दावा फेटाळलेला नसला तरी बँकेचा नवा अध्यक्ष त्यांच्या गटातूनच होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
मतमोजणीनंतर मंत्री सतीश जारकीहोळी तसेच त्यांच्या पॅनेलमधील भालचंद्र जारकीहोळी, विश्वास वैद्य, अरविंद पाटील आणि राहुल जारकीहोळी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी सतीश जारकीहोळी म्हणाले की, निवडणूक प्रचाराच्या काळातील राजकीय वैरभाव आता संपला असून, बँकेचे प्रशासन सुरळीत आणि सहकार्याच्या भावनेतून चालवले जाईल.
भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की बँकेच्या अध्यक्षपदावर लिंगायत समाजातील नेत्याची निवड करण्यात येईल. तसेच काही महिन्यांत बँकेचा शताब्दी महोत्सव बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
